चिखली (ऋषि भोपळे – बुलडाणा कव्हरेज न्युज) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सध्या नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झालेला असून जिल्हा परिषद यांचा कार्यक्रम ही लवकरच घोषित होईल अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या संभाव्य उमेदवारांकडून जोराची तयारी सुरू आहे. सिंदखेडराजा आणि चिखली अशा दोन्ही मतदारसंघांचा प्रभाव असलेल्या शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय घडामोडींना तुफान वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत झाल्यास इथे भाजपा विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत होईल. भाजपच्या संभाव्य उमेदवारीबद्दल बोलायचे झाल्यास इथे भाजप नेते विष्णू घुबे यांच्या अर्धांगिनी सौ. वंदना घुबे व भाजपचे जिल्हा सचिव कृष्णा सपकाळ यांच्या मातोश्री सौ.विमल सपकाळ किंवा अर्धांगिनी सौ.कोमल सपकाळ यांच्यात चुरस आहे.
शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये याआधी भाजपच्या सुनंदाताई शिनगारे या सदस्य होत्या. त्यामुळे महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला जाईल हे जवळपास निश्चित आहे. विष्णु घुबे आणि कृष्णा सपकाळ या दोघांकडूनही सर्कलमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. विष्णु घुबे हे भाजपचे जुने आणि निष्ठावंत चेहरे आहेत. सर्कलमध्ये तळागावात भाजपा पोचवण्यात त्यांचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. पक्षाच्या प्रतिकूल काळात त्यांनी करून ठेवली पक्ष बांधणी आजतागायत कायम आहे. याशिवाय जिल्हा परिषद सर्कल मध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.. दुसरीकडे युवा चेहरा म्हणून पसंतीस उतरत असलेले कृष्णा सपकाळ यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे. अंचरवाडी गावासारखे मोठे शक्ती केंद्र त्यांच्या सोबत आहे. जुन्या जाणत्या मंडळींसह तरुण पिढीची देखील सपकाळ यांना पसंती आहे.एकंदरित भाजपकडून विष्णु घुबे किंवा कृष्णा सपकाळ या दोघांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची दाट शक्यता आहे…
















