घरा मध्ये घुसला,पाठीवर मारून केस धरून खाली पाडले; चापटा बुक्क्यांनी मारहाण करून तू जर शेतात दिसली…

सावखेड नागरे येथे सांडपाण्याच्या वादातून मारहाण व धमकी; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा, दि. १२ जून २०२५: अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावखेड नागरे गावात सांडपाण्याच्या वादातून एका ६० वर्षीय महिलेला मारहाण करून धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सावखेड नागरे येथील रहिवासी सरस्वती मुरलीधर ढवळे (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेजारच्या शेतातील सांडपाणी त्यांच्या शेतात येत होते. याबाबत त्यांनी शेजाऱ्यांना सांडपाणी आपल्या शेतात येऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, याच मुद्द्यावरून वाद वाढला आणि आरोपींनी सरस्वती ढवळे यांच्यावर हल्ला केला. तक्रारीनुसार, आरोपी विनोद अर्जुन मिसाळ आणि सुवर्णा विनोद मिसाळ, दोघेही सावखेड नागरे येथील रहिवासी, यांनी सरस्वती यांच्या घरात घुसून त्यांना लाठीने पाठीवर मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्यांनी सरस्वती यांचे केस ओढून त्यांना जमिनीवर पाडले आणि चापटाने व बुक्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत, “तू जर शेतात दिसलीस तर तुझे मुंडके मोडून फेकून देऊ,” अशी गंभीर धमकी दिली.

या घटनेची तक्रार अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जामदा यांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विनोद मिसाळ आणि सुवर्णा मिसाळ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३३३ (स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे), ११८(१) (स्वेच्छेने दुखापत करणे), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करण्याचा प्रयत्न), ३५१(२) (फौजदारी धमकी), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) आणि ३(५) (सामायिक हेतूने गुन्हा करणे) यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!