अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): उदयनगरचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोज लाहुडकर यांच्याविरुद्ध राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी त्यांनी राष्ट्रध्वज उलटा फडकवल्याचा आरोप आहे. ही घटना 1 मे रोजी घडली असून, यासंदर्भातील तक्रार काल (14 मे) अमडापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
तक्रारीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात सरपंच लाहुडकर यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला. मात्र, त्यांनी राष्ट्रध्वज उलट्या पद्धतीने- हिरवा रंग वर आणि केशरी खाली फडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली नाही, आणि ही चूक दाखवून देणाऱ्याला दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणात बोरगाव काकडे येथील सतीश रामेश्वर काकडे (वय 34) यांनी तक्रार दाखल केली असून, राष्ट्रध्वज अपमान प्रतिबंधक अधिनियमांतर्गत (कलम 171) सरपंच लाहुडकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. ठाकूर करत आहेत.