बिबी (सैय्यद जहीर : बुलडाणा कव्हरेज न्युज)समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीचा प्रकार उघड
समृद्धी महामार्गावरील मांडवा शिवारात अज्ञात चोरट्यांनी उभ्या असलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून तब्बल ३०० लिटर डिझेल चोरी केल्याची घटना घडली आहे. ही घटना मांडवा शिवारातील स्वागत इंडियन ऑइल पेट्रोल पंप परिसरात घडली असून, याप्रकरणी बिबी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर येथील नवीन नगर, भांडेवाडी येथील रहिवासी विवेक कुमार भोला श्रीवास (वय २७, ट्रक चालक) हे डार्सल कंपनीत कार्यरत असून २ जानेवारी २०२५ रोजी लोखंडी टिनपत्र्याचा माल घेऊन ट्रक (MH 40 CD 3092) ने तळोजा, मुंबईकडे निघाले होते. नागपूर येथील जिओ पेट्रोल पंपावर ट्रकमध्ये ३२२.४४ लिटर डिझेल भरल्यानंतर ते समृद्धी महामार्गाने प्रवास करत होते. रात्री साडेसातच्या सुमारास त्यांनी मांडवा शिवारातील पेट्रोल पंपाजवळ ट्रक उभा करून जेवण करून गाडीतच झोप घेतली.
मात्र पहाटे सुमारे ३ वाजता उठल्यानंतर ट्रकच्या डिझेल टाकीचे झाकण उघडे असून खाली डिझेल सांडलेले दिसून आले. तपासणी केली असता टाकीतून सुमारे ३०० लिटर डिझेल (किंमत अंदाजे २७ हजार रुपये) चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. खाजगी सुरक्षारक्षकाकडे चौकशी केली असता त्याने कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून पुढील तपास सुरू आहे.











