चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): “मायबाप सरकार, आम्हाला काहीतरी मदत करा… आमचं होत्याचं नव्हतं झालं”, असा आर्त स्वर आज चिखली तालुक्यातील शेतकरी व गावकऱ्यांच्या तोंडून ऐकू आला. कारण आज सकाळी तालुक्यात निसर्गाने अक्षरशः हाहाकार माजवला.
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! स्वयंचलित कृषी यंत्रांवर 50% अनुदान, काय आहे योजना?
शनिवार (९ ऑगस्ट) रोजी सकाळी सुमारे ११ ते दुपारी १.३० दरम्यान अंबाशी, वरखेड आणि पांढरदेव परिसरात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस झाला. अवघ्या दोन-अडीच तासांत गावातील घरांमध्ये ५ ते ७ फूट पाणी साचले. अनेक कुटुंबांच्या संसारोपयोगी वस्तू पाण्यात भिजून नासल्या.
शेतीचे अतोनात नुकसान
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी प्रचंड खर्च करून सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुग यासारख्या पिकांची लागवड केली होती. पण पिके भरात असतानाच ही ढगफुटी झाली आणि शेत पाण्याखाली गेले. दोन महिन्याचा पीकाचा प्रवास एका क्षणात उद्ध्वस्त झाला.
घर, रस्ते आणि जनावरांची हानी
फक्त शेतीच नाही तर घरांचे छप्पर, भिंती, गावातील रस्ते, जनावरे यांच्याही प्रचंड नुकसानीची नोंद झाली आहे. काही घरांमध्ये तर पाणी इतके शिरले की कुटुंबांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले.
या आपत्तीमुळे ग्रामस्थ आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. पांढरदेव, अंबाशी, वरखेड येथील नागरिक तसेच शेतकरी नेते विनायक सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उपजिल्हा प्रमुख गजानन वायाळ यांनी सरकारकडे तात्काळ पंचनामे करण्याची आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.