साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):साखरखेर्ड्या जवळील एका गावातील विद्यालयात दहावीत शिकणारी १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांपूर्वी फूस लावून पळवून नेण्यात आली होती. या प्रकरणातील पीडित मुलीला अखेर साखरखेर्डा पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथून शोधून काढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विठ्ठल वडूळे (रा. शेंदुर्जन) याने २३ जून २०२५ रोजी लग्नाचे आमिष दाखवून, घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीला पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी २५ जून रोजी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सुरुवातीला तपास दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांच्याकडे देण्यात आला. मात्र, मुलीच्या वडिलांनी वारंवार विनंती करूनही तपासात दिरंगाई झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुढे ठाणेदार गजानन करेवाड यांनी हा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांच्याकडे सोपवला.
पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे व पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास वैराळ यांच्या पथकाने १२ डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे शोधमोहीम राबवली. दिवसभराच्या शोधानंतर मध्यरात्री रांजणगाव-करडे रोडलगत एका वस्तीतून संबंधित जोडप्याला ताब्यात घेण्यात आले.
सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा एका दिवसात छडा लावल्याबद्दल ठाणेदार गजानन करेवाड व पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी गंभीर आरोप करत सांगितले की, सुरुवातीला वेळेत कारवाई झाली असती तर मुलगी लवकर सापडली असती. दिरंगाईमुळेच आपली मुलगी सध्या चार महिन्यांची गर्भवती असल्याचा दावा त्यांनी केला असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. साखरखेर्डा पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.













