सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती तस्करांचा धुमाकूळ; प्रशासनाच्या गाडीवर दगडफेक …

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): सिंदखेड राजा तालुक्यात अवैध रेती तस्करी दिवसेंदिवस बळावत चालली आहे. १० मे रोजी निमगाव वायाळ येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली. अवैध रेती वाहतूक थांबवण्यासाठी उभ्या करण्यात आलेल्या प्रशासनाच्या गाडीवर अज्ञात तस्करांनी दगडफेक केली.

या हल्ल्यात गाडीची समोरील काच फुटली असून, प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे. ही गाडी तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तस्करी थांबवण्यासाठी रस्त्यावर लावण्यात आली होती. परंतु काहीच दिवसांत तस्करांनी थेट सरकारी वाहनावर हल्ला केल्यामुळे त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून आली आहे. तहसीलदार दिवटे यांनी या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर बाब पुढे आली आहे. हिवरखेड पूर्णा, दुसरबीड, निमगाव वायाळ, लिगा या भागांतील अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी नेमले गेलेले ‘बैठे पथक’ काही दिवसांपूर्वी अचानक बंद करण्यात आले. या पथकाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. काही माध्यमांतून पथक ‘मॅनेज’ झाल्याच्या बातम्याही झळकल्या.

त्यानंतर तहसीलदारांनी काही महसूल कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीसही पाठवल्या, पण ठोस कारवाई झालेली नाही.पथक रद्द झाल्यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. “तस्करांना मोकळे रान देण्यासाठीच हे पथक हटवण्यात आले का?” असा सवाल नागरिक करत आहेत. यामुळे तस्करांना अप्रत्यक्ष पाठींबा मिळाल्याची चर्चा जनतेत आहे. सध्या तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!