किनगाव राजा (इशाक कुरेशी:-बुलडाणा कव्हरेज न्युज) किनगाव राजा गावात मागील काही दिवसांपासून गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत आहेत. यामागचे कारण शोधताना ग्रामपंचायतने बसवलेले आरओ फिल्टर एटीएमचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा निष्कर्ष जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आला आहे.
शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाणी?
ग्रामपंचायत इमारतीसमोर काही महिन्यांपूर्वी आरओ फिल्टर एटीएम बसवण्यात आले होते, जेथून नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे हा उद्देश होता. मात्र, गावात गॅस्ट्रोचे रुग्ण वाढू लागल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने विविध ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतले. यामध्ये आरओ एटीएम आणि बोरवेलचे पाणी सुद्धा तपासण्यात आले.जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात हे दोन्ही पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, अशुद्ध पाण्यामुळेच गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आरोग्य विभागाने मांडला आहे.
गॅस्ट्रोमुळे नागरिक त्रस्त, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत रुग्ण वाढले!
गावातील अनेक नागरिकांना मळमळ, उलटी, पोटदुखी अशा त्रासांची तक्रार आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण गॅस्ट्रोने त्रस्त झाले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णसंख्या वाढत असून, तात्काळ औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीला सूचना!आरोग्य विभागाने ता.९ मे व ता.१३ मे रोजी आरओ एटीएम आणि संबंधित बोरवेलचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. ता.१४ व १९ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालात पाणी अशुद्ध असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यानंतर ग्रामपंचायतीला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने लेखी स्वरूपात दिल्या आहेत.
नागरिकांची मागणी : शुद्ध पाण्याचा तातडीने पुरवठा करा…
ग्रामस्थांकडून मागणी होत आहे की, आरओ एटीएम बंद करून, शुद्ध व सुरक्षित पाण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी.कारण, शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
डॉ. परमेश्वर चाटे (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, किनगाव राजा) यांची प्रतिक्रिया …>
“ग्रामपंचायतीकडून लावण्यात आलेल्या आरओ फिल्टर एटीएम आणि बोअरवेलचे पाणी नमुने तपासण्यात आले होते. त्या पाण्यात अशुद्धता आढळली असून, ते पाणी पिण्यास अयोग्य आहे, असा निष्कर्ष प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाला आहे. ग्रामपंचायतीला खबरदारीसाठी आणि तात्काळ उपाययोजनांसाठी अवगत करण्यात आले आहे.”
नमुने येताच सरपंच यांनी घेतली काळजी…
प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव राजा येथे पाण्याचे नमुने तपासून आले पाणी पिण्या अयोग्य आहे त्यानंतर तत्काळ पिण्याचा पाणी मध्ये पावडर टाकून आता पुढील पाणी हे स्वच्छ येईल…