बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष आणि इच्छुकांनी प्रचाराची रूपरेषा आखायला सुरुवात केली आहे. मात्र, या निवडणुका युतीतून लढाव्यात की स्वतंत्रपणे यावर अद्यापही चर्चा रंगत होती.
मात्र या चर्चांना पूर्णविराम देत, केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ना. प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, या निवडणुका महायुती एकत्रितपणेच लढणार आहे.
बुलडाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना ना. जाधव म्हणाले,
“गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व निवडणुका महायुती एकसंघपणे लढणार आहे. महायुती म्हणजे एक ताकद आहे, आणि तीच ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत दिसून येईल.”
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका लढवल्या जातील. लोकसभेत आम्ही मोठा विजय मिळवला, विधानसभेतही विक्रमी बहुमत मिळाले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच झेंडा फडकवू.”
EXCLUSIVE..तिकीट कुणाला? निष्ठावंत कार्यकर्ते की नवीन चेहरे?
या स्पष्ट भूमिकेनंतर जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या राजकारणात महायुतीकडून एकत्रित रणनीती आखली जाण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे गणित आणि संभाव्य जागावाटपावर याचा मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
महायुतीकडून मिळालेला स्पष्ट संदेश हा जिल्हा राजकारणाला नवे वळण देणारा ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष संभाव्य उमेदवारांच्या शर्यतीकडे आणि जागावाटपाच्या समीकरणाकडे लागले आहे.














