चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यात पोलिसांच्या खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकातून आलेल्या चित्रपट निर्मात्या आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून जबरदस्तीने पैसे उकळल्याच्या प्रकारात पाच वाहतूक पोलिसांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कर्नाटकातील चल्लकेरे येथील ताज अ. रहमान (वय २३) हे अकिब अरमान, शेख इब्राहीम आणि जुबेर अहमद यांच्यासोबत कार (केए ११ ए २८६२) मधून मलकापूरजवळ शूटिंगसाठी लोकेशन पाहण्यासाठी येत होते. चिखली-बुलडाणा रस्त्यावर दोन वाहतूक पोलिसांनी त्यांचे वाहन थांबवले आणि कागदपत्रांच्या नावाखाली ३ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर त्यांनी पेटीएमद्वारे चहा विक्रेत्याच्या खात्यात १५०० रुपये भरले आणि पुढे जाण्यास परवानगी मिळाली.
परंतु, काही अंतरावर पुढे तीन इतर पोलिसांनी पाठलाग करत पुन्हा वाहन अडवले. गाडीत ठेवलेल्या एअर रायफलवरून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी २ लाख रुपये मागितले. तडजोड करत ५० हजार रुपये क्युआर कोडने भरण्याची मागणी केली. ताज रहमान यांना संशय आल्याने त्यांनी वाहन घेऊन निघण्याचा प्रयत्न केला. गाडीत बसलेल्या दोन पोलिसांनी “पैसे नको, पण आम्हाला उतरवा,” असे सांगत त्यांना गाडीतून उतरवले. मात्र गाडीचा तोल सुटल्याने अपघात झाला.
या प्रकारानंतर ताज रहमान यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, कॉन्स्टेबल टेकाळे (चिखली पो.स्टे.) आणि भंडारी (जिल्हा वाहतूक शाखा) यांनी चहा विक्रेत्याच्या खात्यात १५०० रुपये ऑनलाईन भरायला लावले. तर महामार्ग पोलिस मदत केंद्रातील काळुसे, आंधळे आणि किरके यांनी २ लाखांची खंडणी मागितली आणि नंतर ती ५० हजारांवर आणली.
अपघातानंतरही धमक्या…
अपघातानंतरही पोलिसांनी “पैसे दिले नाहीत, म्हणून मोठी कारवाई होईल” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर घटनास्थळी आलेल्या इतर पोलिसांना देखील “पैशांबाबत काही सांगू नका” असा दबाव आणल्याचे ताज रहमान यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
गुन्ह्यांची नोंद…
या पाचही पोलिसांविरोधात गंभीर स्वरूपाचे कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मृत्यू होण्याची शक्यता असलेली कृती, धमकी, जबरदस्ती आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वर्तनासंबंधीचे विशेष कलमांचा समावेश आहे.
पोलिसांची अशी वर्तणूक जनतेचा विश्वास ढासळवणारी ठरत असून या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.