संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): संग्रामपूर तालुक्यातील टुनकी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने शौच करून गंभीर कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या टाकीतून तालुक्यातील आठ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. टाकीत घाण आढळल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हा प्रकार गुरुवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आला. टाकीतील पाण्यातून दुर्गंध येत असल्याने संशय आल्यावर ग्रामस्थांनी तपासणी केली असता टाकीत मानवी विष्ठा आढळून आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन टाकी स्वच्छ करण्याचे आदेश दिले. सध्या टाकीची साफसफाई आणि निर्जंतुकीकरणाचे काम सुरू असून, पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
या घृणास्पद कृत्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. टुनकी गावातील पाण्याच्या टाकीतून परिसरातील आठ गावांना पाणीपुरवठा होतो, त्यामुळे हा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे.