सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पळसखेड चक्का गावातील २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मृत तरुणाचे नाव हरिओम उर्फ सचिन दिनकर ढाकणे (वय २४) असे आहे. त्याचा मृतदेह बुधवारी सकाळी सावखेड–जनफाटा रस्त्यालगत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आशिष इंगळे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तपासणी झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला आणि दुपारीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, हरिओमचा मृत्यू संशयास्पद असल्याने त्याचे वडील यांनी पोलिसांकडे सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या आधी मंगळवारी रात्री हरिओम आपल्या एका मित्रासोबत होता. दोघांनी रात्री उशिरापर्यंत मद्यपान केले असल्याचे समोर आले आहे. अतिरिक्त मद्यप्राशनामुळे मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
















