खाकीला पुन्हा कलंक! किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्याकडून फिर्यादीस बेदम मारहाण; युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न..
किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) फलटण येथील महिला डॉक्टरवरील पीएसआय अत्याचारप्रकरणानंतर आता बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्येही खाकीला कलंक लावणारी घटना घडली आहे. चोरीला गेलेली बैलजोडी व बैलगाडी परत मिळावी, यासाठी तक्रार देऊनही काहीच कारवाई न झाल्याने फिर्यादी युवकाने एसपी कार्यालय गाठले. फलटण येथील महिला डॉक्टरवर पीएसआयने अत्याचार केल्याची घटना राज्यभरात गाजत आहेत. तशीच खाकिला कलंकित करणारी घटना किनगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये घडली आहे. चोरीला गेलेली बैलजोडीची व बैलगाडी परत मिळावी यासाठी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने फिर्यादीने एसपी कार्यालय गाठले. त्यामुळे पित्त खवळलेल्या ठाणेदार संजय मातोंडकर याने फिर्यादीला पोलिस स्टेशनमध्येच मारहाण केली. हे महाशय एवढ्यावरच थांबले नाही तर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी युवकाने विष प्राशन केले. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
किनगाव राजा पोलिस स्टेशन अंतर्गत लिंगा देवखेड येथील पवन प्रल्हाद जायभाये या युवकाची बैलजोडी चोरीला गेली होती. ही बैलजोडी परत मिळावी यासाठी या युवकाने दोन तीन दिवस किनगाव राजा पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारल्या. मात्र कुठलीही कारवाई तर दूर साधी फिर्याद घ्यायलाही किनगाव राजा पोलीस तयार नव्हते. अखेर न्याय मिळावा, यासाठी या युवकाने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात धाव घेतली. पोलीस अधीक्षक कार्यालयातून ठाणेदार संजय मातोंडकर यांना कॉल जाताच त्यांनी फिर्यादी युवकास ठाण्यात बोलावले.
तसेच कॅमेरे बंद करून फिर्यादी युवकास बेदम मारहाण केली.त्यानंतर फिर्यादी युवकास गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या युवकावर जालना येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खाकीला कलंक लावणाऱ्या ठाणेदार मातोंडकर याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
व्हिडीओ तयार करून केले विष प्राशन…
पवन जायभाये या युवकाची बैलजोडी काही जणांनी सोडून नेली होती. हा युवक त्याच्या वडीलांबरोबर तीन वर्षांपासून राहत नाही. मात्र, गावातील काही जणांनी युवकाच्या वडीलांच्या व्यवहारातून युवकाची बैलजोडी सोडून नेली. ही बैलजोडी चोरी गेल्याची तक्रार देण्यासाठी पवन जायभाये यांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारल्या. मात्र, मुजोर ठाणेदार संजय मातोंडकर याने फिर्यादही दाखल केली नाही. त्यामुळे, किनगाव पोलीस आपल्याला न्याय देवू शकत नसल्याचे दिसताच या युवकाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यावर पित्त खवळलेल्या मातोंडकर लाथा मारल्या, बुक्यांचा मार दिला… तोंडात चपटा मारल्या… तुझी कंप्लेंट घेणार नाही,बैलगाडी देणार नाही… ते पैसे आणून दे… तुलाच पैसे द्याव लागेल… असा दम दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
विशेष म्हणजे पोलिसांनी फिर्यादीस पोलीस स्टेशनमध्ये बोलावले तेव्हा ज्याच्यावर आरोप केले तो जऊळका येथील कारभारी सांगळे हा देखील तेथे हजर होता. न्याय मिळत नसल्याने पवन जायभाये या युवकाने व्हिडीओ तयार करून विष प्राशन केले. त्यामुळे, फलटन प्रमाणाचे बुलढाणा जिल्ह्यातही खाकी कलंकित झाली आहे.
ठाणेदार मातोंडकर जेथे जातात तेथे वादग्रस्त …
ठाणेदार संजय मातोंडकर यांची जिल्ह्यातील कारकिर्द आतापर्यंत वादग्रस्त राहीली आहे. यापूर्वी ते चिखली ठाण्यात तर काही दिवस ते स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. तरीही त्यांच्याकडे किनगाव राजा पोलीस स्टेशनचा प्रभार देण्यात आला आहे. तेथेही यांनी फिर्यादीलाच मारहाण केली आहे. राज्यभरात गत काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास उडत आहे…













