बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातील सर्वप्रथम नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने जिल्हाभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
खामगावसह बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच वंचित बहुजन आघाडी यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे सर्वच पक्षांत इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू केला आहे. निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर न झाल्या असल्या तरी ‘आपकी बार…’ अशा प्रकारच्या पोस्ट, फोटोशूट आणि प्रचार व्हिडिओंची रणधुमाळी सुरू आहे.
निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाकडून उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, सोशल मीडियावर वाढत्या इच्छुकांच्या पोस्ट पाहता यंदा उमेदवारांची संख्या अधिक राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीबाबत अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांनी पक्षांतर्गत गटबाजी सुरू केली आहे.
युती अथवा आघाडीचा निर्णय लागल्यास अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी पक्षांतर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, त्यातून बंडखोरीचे सावट गडद होत चालले आहे. नेत्यांच्या वारंवार पक्षांतराच्या ‘उड्यांमुळे’ कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाला नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार असून, त्यामुळे यंदाची नगरपालिका निवडणूक कोणत्याही पक्षासाठी सोपी ठरणार नाही, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.
















