बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): नाही म्हणता म्हणता अखेर गावपातळीवरच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाच रं! भर उन्हाळ्यातच आता बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण राजकारण चांगलंच तापणार आहे. त्यातच लगीनसराईचे दिवस सुरू असल्याने गावपुढाऱ्यांची धावपळ आणखी वाढणार असल्याचं चित्र दिसतंय. राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच आज, १७ मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
या आचारसंहितेमुळे आता मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या घोषणा किंवा मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कृती करता येणार नाहीत. निकाल जाहीर होईपर्यंत ही आचारसंहिता कडकपणे लागू राहणार असून नियमभंग केल्यास कारवाई होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आता जपून पावलं टाकावी लागणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ५९ ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ३० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून ७ ते १३ एप्रिलदरम्यान नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १५ एप्रिलला छाननी, तर १७ एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.
मतदान मंगळवार, २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पार पडणार असून मतमोजणी २९ एप्रिलला होणार आहे. “आचारसंहितेचे काटेकोर पालन करा,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. आता गावागावात राजकीय रंग चढणार असून कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.















