मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – इंस्टाग्रामवर पाठवलेला एक साधा इमोजी एका कॉलेज तरुणाच्या आयुष्याला मोठा वळण देऊन गेला. अल्पवयीन मुलीला मानसिक त्रास दिल्याच्या आरोपाखाली संबंधित तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला थेट कारागृहात जावे लागले आहे.ग्रामीण भागातील १६ वर्षांची मुलगी ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल वापरत होती. त्याच गावातील १८ वर्षे ९ महिने वयाचा कॉलेजमध्ये शिकणारा तरुण तिच्या इंस्टाग्राम अकाउंटशी जोडला गेला. सुरुवातीला साध्या गप्पा सुरू होत्या. पुढे तरुणाने इमोजी व चिन्हांच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.मात्र हा प्रकार मुलीसाठी त्रासदायक ठरला. तिने घरच्यांना सांगितल्यानंतर प्रकरण चिघळले. नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आणि अखेर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत कोणतीही चालढकल न करता तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.“मी फक्त इमोजी पाठवला, काही चुकीचे केले नाही,” असे सांगणाऱ्या तरुणाला कायद्याची कठोरता अनुभवावी लागली. ही घटना तरुणांसाठी आणि पालकांसाठी गंभीर इशारा ठरत आहे.इशारा ….मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करताना भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अल्पवयीन मुलांशी कोणताही संवाद, अगदी इमोजीही, कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरू शकतो. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे आणि तरुणांनीही जबाबदारीने व मर्यादेत राहूनच सोशल मीडिया वापरावा.
प्रेमाचा इमोजी महागात; कॉलेज तरुण थेट कारागृहात…! इंस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीला इमोजी पाठवणे ठरले गुन्हा..! पोक्सो कायद्यान्वये कारवाई, तरुणाला अटक…













