मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) — भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (२८ ऑक्टोबर) दुपारी सुमारास छत्रपती संभाजीनगर–नागपूर महामार्गावरील खंडाळा देवी येथील सत्यजित कॉलेजसमोर घडली.
अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव शिवम यादवराव जाधव (रा. वसारी, जि. वाशीम) असे आहे, तर गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव गणेश भागवत कष्टे (वय १९, रा. लोणी गवळी) असे आहे.
दोघेही एमएच २८ ए डब्ल्यू २७४५ या क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते. खंडाळा देवी येथील सत्यजित कॉलेजसमोर येताच दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यावर घसरली. यात शिवम जाधव याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश कष्टे गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृतक शिवम जाधव हा डोणगाव येथे आपल्या मामाकडे (गोपाल आखाडे) राहून अंजनी येथील शिंदे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.











