मुंबई (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी चिखलीच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी मुंबईत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणासह सुधारणा आणि इतर बांधकाम विषयक प्रलंबित कामांना मंजुरी मिळवण्यात त्यांना यश आले आहे.
आमदार सौ. श्वेता महाले यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पाच प्रमुख रस्त्यांच्या सुधारणेसाठी विशेष मागणी केली होती. यामध्ये खालील रस्त्यांचा समावेश आहे:
- राष्ट्रीय महामार्ग 753-A ते येळगाव, साखळी बुद्रुक, शिरपूर, सोनेवाडी, सावरगाव डुकरे या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा.
- राष्ट्रीय महामार्ग 753-A ते मालगणी, सावरगाव डुकरे, वाघापूर, अंत्रीकोळी, गोद्री, चांदई रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा.
- राष्ट्रीय महामार्ग 548 CC ते करणखेड, सावरखेड, ककळा, डासाळा रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा.
- हातणी, वळती, सोमठाणा, पेठ, आन्वी, शेलगाव जहांगीर रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा.
- गिरोला, सवणा, दिवठाणा, बोरगाव वसू, खंडाळा ते भालगाव, रोहडा, मेरा रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा.
या पाचही रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी वाव, खडीकरण आणि डांबरीकरण यासारख्या सुधारणांना तातडीने मंजुरी देण्याचे आश्वासन बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार सौ. श्वेता महाले यांना दिले आहे. या कामांसाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
याशिवाय, चिखली ते मलकापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सुमारे 124 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. यासंदर्भातही आमदार सौ. श्वेता महाले यांनी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली. येत्या हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.
चिखली मतदारसंघातील एकूण चौदा रस्त्यांची कामे जागेच्या अनुपलब्धतेसह इतर तांत्रिक अडचणींमुळे रखडली होती. या सर्व अडचणींचा आढावा घेऊन आमदार सौ. श्वेता महाले यांनी बांधकाम मंत्र्यांसमोर सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता श्री. काळे आणि उपकार्यकारी अभियंता श्री. दीपक चिंचोले उपस्थित होते. मंत्र्यांनी या सर्व अडचणी दूर करून रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी योग्य त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या बैठकीत आमदार सौ. श्वेता महाले यांनी ठेकेदार आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यांवर खड्डे पडणे किंवा रस्ते मुदतपूर्वीच खराब होण्याच्या समस्येवरही चर्चा केली. यावर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठाम भूमिका घेतली. ते म्हणाले, “निविदेमध्ये नमूद केलेल्या कालावधीपूर्वी रस्ते खराब झाल्यास किंवा खड्डे पडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि कंत्राटदार यांची असेल. अशा प्रकरणांमध्ये रस्त्यांमुळे अपघात झाल्यास कंत्राटदारांवर कायदेशीर कठोर कारवाई प्रस्तावित केली जाईल.”
या भेटीमुळे चिखली मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासकामांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार सौ. श्वेता महाले यांच्या पाठपुराव्यामुळे आणि बांधकाम मंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नागरिकांना लवकरच सुधारित आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध होणार आहेत.