मलकापूर पांग्रा (ज्ञानेश्वर कळकुंबे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजार हा परिसरातील सर्वात मोठ्या आणि जुन्या बाजारपेठांपैकी एक आहे. या बाजारात सुमारे सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वी व्यवसायिकांसाठी गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून प्रशासनाने या गाळ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
जीर्ण झालेले हे गाळे कधीही कोसळण्याच्या स्थितीत असून, यामुळे व्यवसायिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. या गाळ्यांची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी, अशी मागणी व्यवसायिकांकडून सातत्याने केली जात आहे.
मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजारात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, चिखली, देऊळगाव राजा यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने येतात. या बाजारातील गाळ्यांची दुरवस्था ही केवळ व्यवसायिकांसाठीच नव्हे, तर ग्राहकांसाठीही डोकेदुखी ठरली आहे. गाळ्यांवरील पत्रे तुटलेली असून, भिंतींना तडे गेले आहेत. पावसाळ्यात गाळ्यांमधून पाणी गळण्याच्या घटना वारंवारी घडतात, ज्यामुळे व्यवसायिकांचे मालाचे नुकसान होते. “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही याच जीर्ण गाळ्यांमध्ये व्यवसाय करतोय. कधीही कोसळण्याची भी श्यांती वाटते. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे,” अशी भावना स्थानिक व्यापारी सय्यद अमीर यांनी व्यक्त केली.
संतापजनक…! अकरा वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन नरधमाने केला अत्याचार! धाड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना…
गाळ्यांच्या दुरवस्थेसोबतच बाजारातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, नाल्या कचर्या ने आणि गटाराने भरलेल्या आहेत. थोडासा पाऊस पडला तरी बाजारात चिखल आणि पाण्याचा खड्डा तयार होतो, ज्यामुळे चालणेही कठीण होते. अनेक व्यवसायिकांना नाल्यांजवळच दुकाने लावावी लागतात, तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना घाण पाण्यातून वाट काढावी लागते. “बाजारात येणार्या प्रत्येकाला या परिस्थितीमुळे त्रास होतो. प्रशासन केवळ महसूल गोळा करते, पण सुविधा देण्याकडे त्यांचे लक्षच नाही,” अशी खंत व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
बाजार लिलावातून प्रशासनाला दरवर्षी सुमारे सात लाख रुपये महसूल मिळतो. मात्र, या उत्पन्नाचा वापर बाजारातील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी होताना दिसत नाही. बाजारातील पाण्याची टाकी खराब झाली आहे, तर शौचालयेही बंद अवस्थेत आहेत. यामुळे विशेषतः महिला ग्राहकांना आणि व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. “जीर्ण गाळ्यांमुळे आमच्या जीवाला धोका आहे. पत्रे तुटलेली आहेत, कधीही खाली पडू शकतात. प्रशासनाने नवीन गाळे बांधावेत आणि सुविधा द्याव्यात,” अशी मागणी व्यापारी संजय पाटील यांनी केली.
मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजार हा केवळ आर्थिक व्यवहारांचे केंद्र नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या बाजाराची अवस्था बिकट झाली आहे. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. जीर्ण गाळे पाडून नव्याने बांधकाम करणे, स्वच्छता राखणे आणि मूलभूत सुविधा पुरवणे यासाठी ठोस उपाययोजना हाती घेतल्यास व्यवसायिक आणि ग्राहकांना दिलासा मिळेल. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यवसायिक आणि नागरिक व्यक्त करत आहेत.
3 thoughts on “मलकापूर पांग्रा आठवडी बाजारातील जीर्ण गाळ्यांमुळे व्यवसायिकांच्या जीवितास धोका; प्रशासनाचे दुर्लक्ष”