चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): मलगी गावात काल (२६ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत अंगणवाडी मदतनीस शोभाबाई रमेश परिहार आणि त्यांचा २४ वर्षीय मुलगा राजेश परिहार गंभीररित्या भाजले आहेत.
स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. क्षणात स्वयंपाकघरात ज्वाळा पसरल्या आणि आई-मुलगा त्यात सापडले. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की गावकरी घराबाहेर धावत आले. शोभाबाईंच्या अंगावरील साडी जळून खाक झाली असून हाताला आणि केसांना गंभीर दुखापत झाली आहे. मुलगा राजेशच्या पायाला गंभीर भाजल्या आहेत.
लाडक्या बहीणींना ‘हे’ काम करावेच लागणार; अन्यथा खात्यात १५०० रुपये जमा होणार नाही
गावकऱ्यांनी धाडस दाखवत दोघांना बाहेर काढले आणि तातडीने संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, स्फोटानंतर गावात मोठी गर्दी जमली होती. चिखली नगरपरिषद अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच चिखली पोलिसांनी पंचनामा केला. तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकांत राऊत, सरपंच विनायक साप्ते व दिलीप शितोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.















