बुलढाण्यात महाविकास आघाडी एकजुटीने लढणार स्थानिक स्वराज्य निवडणुका: डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलढाण्यात महाविकास आघाडी एकजुटीने लढणार स्थानिक स्वराज्य निवडणुका: डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांसाठी खरा कस असतो. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकसंघपणे आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे, असे ठाम मत माजी मंत्री आणि आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले. बुलढाण्यातील नर्मदा हॉलिडेज येथे २२ जून २०२५ रोजी महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिंगणे उपस्थित होते.

या बैठकीला आमदार सिद्धार्थ खरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार राजेश एकडे, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेश शेळके, प्रसेनजीत पाटील, नानाभाऊ कोकरे, प्रकाश पाटील, साहेबराव सरदार यांच्यासह पांडुरंग पाटील, दत्ता पाटील, लक्ष्मणराव घुमरे, छगन मेहेत्रे, संगीतराव भोंगळ, ज्योती खेडेकर, बी.टी. जाधव, अशोक पडघान, दत्तात्रय लहाने, रियाज खान पठाण, संदीप शेळके, नंदू कऱ्हाडे, आशिष राहटे, गजानन वाघ, संतोष रायपुरे, शुभम पाटील आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्यवेळी, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. शिंगणे यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “राज्यातील सत्ताधारी पक्षांनी केवळ प्रलोभनांच्या जोरावर सत्ता मिळवली. ‘लाडकी बहिण योजना’सारख्या योजना आणि इतर घोषणा फक्त निवडणुकीपुरत्या मर्यादित होत्या. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांना पीककर्ज आणि विम्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्या मुद्द्यांवर जनता नाराज आहे आणि ती महाविकास आघाडीकडे आशेने पाहत आहे.”

स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुतीच्या एकसंघ ताकदीनेच लढणार! केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांचे स्पष्ट संकेत…

त्यांनी पुढे सांगितले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने आणि त्यागाच्या भावनेने काम करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कंबर कसली पाहिजे.”

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले की, या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी समन्वय आणि एकजुटीच्या जोरावर ताकदीनिशी मैदानात उतरेल. आमदार सिद्धार्थ खरात यांनी ग्रामीण भागात सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेचा प्रचंड रोष असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “हा रोष या निवडणुकांमध्ये नक्कीच दिसून येईल आणि महाविकास आघाडीला जनतेचा पाठिंबा मिळेल.” माजी आमदार राजेश एकडे यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी स्थानिक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “जनतेच्या प्रश्नांवर रान उठवले पाहिजे. कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यांना महाविकास आघाडीचा पर्याय द्यावा.” काँग्रेसचे श्याम उमाळकर यांनी नेत्यांमधील समन्वयाच्या महत्त्वावर भर देत कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

या बैठकीचे सूत्रसंचालन लखन गाडेकर यांनी केले, तर गजानन धांडे यांनी आभार मानले. बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकजुटीने आणि ताकदीनिशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “बुलढाण्यात महाविकास आघाडी एकजुटीने लढणार स्थानिक स्वराज्य निवडणुका: डॉ. राजेंद्र शिंगणे”

Leave a Comment

WhatsApp Join Group!