डोणगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज) :राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत आहे. जून २०२४ मध्ये जाहीर झालेल्या व ऑगस्ट २०२४ पासून अंमलात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपये थेट जमा करण्यात येतात.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आला. मात्र आता या योजनेत काही अपात्र लाभार्थी लाभ घेत असल्याचे समोर आले असून महिला व बालविकास विभागाने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सुरुवातीला ६ लाख ७१ हजार १८३ महिला पात्र लाभार्थी होत्या. यामध्ये एका रेशनकार्डवर जास्त महिलांचा लाभ, ६५ वर्षांवरील वयोमर्यादा, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक, नोकरदार महिला आदी कारणांमुळे ३० हजार ४०३ महिलांचा लाभ बंद करण्यात आला. सध्या जिल्ह्यात ६ लाख ४० हजार ८७९ महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
दरम्यान आधार पडताळणीत जिल्ह्यातील ४५० लाभार्थी पुरुष असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सर्वांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला असून महिला व बालविकास विभागामार्फत त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
पडताळणीनंतर लाभार्थी प्रत्यक्षात महिला असून आधार कार्डमध्ये चुकीने पुरुष अशी नोंद झालेली असल्यास आधार अपडेट करून त्यांचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित महिलांना महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे. मात्र जर लाभार्थी पुरुष असून त्यांनी महिलांच्या नावावर अथवा चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून घेतलेली रक्कम परत वसूल करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मेहकर तालुक्यातील जवळा व जानेफळ येथे यापूर्वीही काही पुरुषांनी महिलांच्या नावावर या योजनेचा लाभ घेतल्याचे प्रकार समोर आले होते. सध्या महिला व बालविकास कार्यालयाच्या यादीत मेहकर तालुक्यातील ४४ लाभार्थ्यांचे आधार कार्ड पुरुषांचे निघाले असून त्यांचीही पडताळणी सुरू आहे.
या प्रकरणामुळे लाडकी बहीण योजनेतील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, आता प्रशासनाची पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














