शेतकरी धोंडोजी इंगळे पुराच्या पाण्यात वाहून गेले!खामगाव तालुक्यातील घारोड येथील हृदयद्रावक घटना; शोधकार्य सुरू!

खामगाव ( बुलडाणा कव्हरेज न्युज) जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, खामगाव तालुक्यातील घारोड येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ७० वर्षीय शेतकरी धोंडोजी भगवान इंगळे हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली असून, सध्या त्यांचा शोध सुरु आहे.

घटनेचा सविस्तर आढावा..

२७ मे रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोली-घारोड रस्त्यावरील नाल्याला जोरदार पूर आला होता. त्याच रात्री सुमारे ८ वाजता, धोंडोजी इंगळे हे आपल्या पुतण्यासोबत (राहुल मधुकर इंगळे) दुचाकीवरून शेतातून घरी जात होते. नाल्याच्या पुलावरून जात असताना दोघेही दुचाकीसह अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले.

राहुल बचावला, पण धोंडोजी गायब..

राहुल इंगळे याला पोहता येत असल्याने त्याने कसाबसा आपला जीव वाचवला. मात्र धोंडोजी इंगळे दुचाकीसह वाहून गेले आणि अद्याप त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.

पोलीस व प्रशासन घटनास्थळी..

या घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास चौधरी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरु असून, पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने अडथळे येत आहेत.

मंत्री फुंडकर यांनी घेतली दखल..

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री आकाश फुंडकर यांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून तात्काळ शोधकार्य वेगाने राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील पावसाची स्थिती चिंताजनक..

गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाचा जोर कायम आहे. नदी-नाले तुडुंब भरले असून अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची उन्हाळी पिके पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!