चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खैरव आणि चिखली परिसरातील शेतकरी सध्या एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे हैराण झाले आहेत. यंदा वेळेवर पेरणी झाली, पण अतिवृष्टी, नीलगायी आणि हुमणी अळी यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटांमुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली असून, त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे.
खैरव येथील शेतकरी दत्तात्रय कुटे यांच्या ३ एकर आणि अक्षय सोनुने यांच्या २ एकर शेतात हुमणी अळीमुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यांनी १४ जून २०२५ रोजी ३३५ जातीच्या सोयाबीनची पेरणी केली होती. दत्तात्रय यांना प्रत्येक बॅगसाठी ३,००० रुपये याप्रमाणे एकूण ९,००० रुपये बियाण्यांवर खर्च झाले. याशिवाय पेरणी, तणनाशक फवारणी, बीजप्रक्रिया, हुमणी अळी नियंत्रणासाठी औषधे आणि खते इत्यादी चा खर्च मिळून त्यांना जवळपास २५,००० रुपये खर्च आला. अक्षय सोनुने यांनाही १५,००० ते १६,००० रुपये खर्च आला. मात्र, हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे दोघांना आपल्या शेतात रोटर फिरवावे लागले. कृषी विभागाने सुचवलेले मेटारायझियम औषध वापरूनही अळींचा प्रादुर्भाव रोखता आला नाही, परिणामी संपूर्ण पीक नष्ट झाले. त्यामुळे कृषी विभाग शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शेतकऱ्यांवर नवे संकट: रोहयांकडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष
मागील वर्षीही या भागात हुमणी अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी पंचनामे झाले, पण शासनाकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. यंदाही शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. खैरवसह आसपासच्या भागात हुमणी अळीमुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांवर रोटर फिरवावे लागले आहे, ज्यामुळे त्यांचा खर्च दुप्पट झाला असून, त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे.
याशिवाय, मेरा बु. भागात नीलगायींमुळेही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. एका शेतकऱ्याचे २ एकर क्षेत्र एका क्षणात नीलगायींनी (रोही) उद्ध्वस्त केले असल्याचे वृत्त आहे. अतिवृष्टी आणि नीलगायींसह आता हुमणी अळीच्या संकटाने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पुढील पेरणीसाठी त्यांना आर्थिक आधार मिळेल.
या संकटांनी खैरव, चिखली आणि आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुबार पेरणीमुळे त्यांचा खर्च वाढला असून, पुढील उत्पन्नाची कुठलीही शाश्वती नाही. हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे लवकरात लवकर नुकसानभरपाई आणि मदतीची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना या आर्थिक संकटातून सावरण्याची पुन्हा एकदा संधी मिळेल.
2 thoughts on “खैरव भागातील शेतकऱ्यांवर हुमणी अळीचे संकट; शेतकऱ्यांनी सोयाबीन मध्ये फिरवले रोटर”