भरोसा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील भरोसा येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी दांपत्याच्या कुटुंबीयांची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज (२७ जुलै) भेट घेऊन सांत्वनपर दिलासा दिला. या वेळी त्यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून, “कोणत्याही परिस्थितीत टोकाची भूमिका घेऊ नका,” असे आवाहन केले.
शेतकरी गणेश श्रीराम थुट्टे (वय ५५) आणि त्यांच्या पत्नी रंजना गणेश थुट्टे (वय ५०) यांनी काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हमणी अळीचा प्रचंड प्रादुर्भाव, पीक नुकसानीमुळे निर्माण झालेली आर्थिक अडचण, कर्जाचा वाढता बोजा आणि शेतीवरील अपयश यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, असे सांगण्यात येत आहे.
या दुःखद घटनेची माहिती मिळताच केंद्रीयमंत्री जाधव यांनी गावात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावरून शक्य ती मदत दिली जाईल, असे आश्वासनही दिले.
या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, तालुका प्रमुख गजानन मोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर, राजू पाटील, बाबुराव हाडे, तालुका प्रमुख पंजाबराव जावळे, अनमोल ढोरे, भाजपचे उपतालुकाध्यक्ष विष्णू घुबे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.