बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा तालुक्यातील करवंड येथील आरोग्य उपकेंद्रात सापडलेला संशयास्पद गोळा हा प्रत्यक्षात मानवी अर्भकाचाच असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

ही घटना ११ जून रोजी सकाळी ९ वाजता घडली होती. आरोग्य उपकेंद्राच्या आवारात एक फिकट लालसर रंगाचा गोळा आढळून आला होता. त्यामध्ये डोके, तीन नखे, एक हात, एक मोठा पाय आणि एक लहान पाय दिसत होते. या गोळ्याकडे पाहूनच त्यात काहीतरी संशयास्पद असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर आरोग्य विभागाने हा गोळा तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवला. पुढील तपासणीसाठी तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील अॅनाटॉमी विभागात पाठवण्यात आला. सुमारे अकरा दिवसांनी आलेल्या अहवालात, हा गोळा प्रत्यक्षात मानवी अर्भकाचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेमुळे परिसरात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
- हे अर्भक करवंड गावातीलच आहे की दुसरीकडून आणून येथे फेकण्यात आले?
- हे अनैतिक संबंधातून झालेले गर्भपात आहे की स्त्री भ्रूणहत्या?
- कोणी हेतुपुरस्सर हा अर्भक फेकून दिला?
अर्भक मुलगी आहे की मुलगा याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र जर ते स्त्री अर्भक असल्याचे समोर आले, तर स्त्री भ्रूणहत्येची शक्यता बलवत्तर ठरू शकते.
सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, आजूबाजूच्या रुग्णालयांची चौकशी, तसेच गावातील गरोदर महिलांची यादी यासारख्या दिशांनी तपास सुरू आहे. ही घटना केवळ गुन्हेगारी स्वरूपाचीच नाही, तर समाजातल्या गंभीर मानसिकतेचेही प्रतिबिंब असल्याचे बोलले जात आहे.














