चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी १२ डिसेंबर रोजी विधानसभेत लोकहिताच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारकडे ठोस मागण्या केल्या. शेतकरी, गोरगरिब, कंत्राटी कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच विविध समाजघटकांच्या समस्या त्यांनी प्रभावीपणे सभागृहात मांडल्या.
आमदार महाले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना २०१३ साली जाहीर झालेल्या पॅकेजचा दाखला दिला. त्या वेळी जाहीर केलेल्या १२,२६६ कोटी रुपयांपैकी केवळ २५ टक्के रक्कम प्रत्यक्ष वितरित झाली होती, असे त्यांनी सांगितले. त्याउलट सध्याच्या महायुती सरकारने जाहीर केलेल्या २१,६२८ कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी सुमारे १७,००० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले असून उर्वरित मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विदर्भ व मराठवाड्यात कापूस प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कापूस ते कापड या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिनिंग, स्पिनिंग, शिवण, रंगकाम व फिनिशिंग उद्योग उभारावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच उद्योगांसाठी स्वस्त वीज, पाणी, जमीन, साठवणूक केंद्रे आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सांगितले.
चिखली व बुलढाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२४-२५ खरीप हंगामातील पीकविम्याची प्रलंबित १४.०४ कोटी रुपयांची रक्कम तात्काळ देण्यात यावी आणि एकही शेतकरी विम्यापासून वंचित राहू नये, अशी ठाम मागणी आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत केली.













