देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जमीन विकत घेऊन देतो, असे आमिष दाखवत पत्नीसह तिचे आई-वडील, भाऊ व आणखी एका इसमाने संगनमत करून तब्बल १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ८ मे ते १४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत गारगुंडी येथे घडली असून, याप्रकरणी ३० डिसेंबर २०२५ रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश तुकाराम काकड (वय ३४, रा. गारगुंडी, ता. देऊळगाव राजा) यांचे सासरे वाल्मिक मारोती सांगळे, सासू सागरबाई वाल्मिक सांगळे, साळा सचिन वाल्मिक सांगळे (सर्व रा. आंतरवाली सराटी, ता. घनसावंगी, जि. जालना), फिर्यादीची पत्नी वर्षा गणेश काकड (रा. गारगुंडी, ह.मु. आंतरवाली सराटी) तसेच विलास भानुदास सहारे (रा. उमरद) यांनी संगनमत केले.
आरोपींनी सचिन वाल्मिक सांगळे यांच्या नावावर असल्याचे सांगत आंतरवाली सराटी शिवारातील गट क्रमांक १०६ मधील ७० आर शेती विकत घेऊन देतो, असा सौदा केला. या सौद्याच्या नावाखाली फिर्यादीकडून १७ लाख रुपये उकळण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात जमीन खरेदी न करता आरोपींनी फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
इतकेच नव्हे तर, पैसे परत मागितल्यास फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांवर कौटुंबिक हिंसाचाराच्या खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गणेश काकड यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सौ. वर्षा गणेश काकड, वाल्मिक मारोती सांगळे, सागरबाई वाल्मिक सांगळे व सचिन वाल्मिक सांगळे यांच्याविरुद्ध भा.दं.सं. कलम ४२०, ४०६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत असून, आरोपींची भूमिका व आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे.













