चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):जालना–खामगाव बायपासवरील अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसून आज पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. चिखली शहरालगत असलेल्या काजी ले-आउट कमानीसमोर दुचाकीचा तोल सुटून थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर आदळल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
या अपघातात विजय दांडगे हे कोणड बुद्रुक, ता. जाफ्राबाद हे येथील असून ते गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय दांडगे हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी कोणड येथून दिवठाणा येथे गेले होते. दिवठाणा येथून परत आपल्या गावी जात असताना चिखली शहरालगतच्या जालना–खामगाव बायपासवर अचानक त्यांच्या दुचाकीचा तोल सुटला. क्षणार्धात दुचाकी थेट दुभाजकावर जोरात आदळली.
या जोरदार धडकेत विजय दांडगे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना डॉ. राऊत यांच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना तात्काळ संभाजीनगर येथे रेफर केले आहे.











