शेळगाव आटोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर गायब; युवा सेनेचे प्रतिकात्मक आंदोलन

शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती असूनही एकही डॉक्टर नियमितपणे उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्ण सकाळपासून उपचारासाठी केंद्रात येतात, तासन्तास वाट पाहतात, पण डॉक्टर नसल्याने त्यांना हताश होऊन परत जावे लागते. या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

आज सकाळी शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी स्वतः आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी तिथे एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळले. या गलथान कारभारावर संतापलेल्या भुतेकर यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतीकात्मक आंदोलन केले. त्यांनी स्वतः “डॉक्टर” बनून रुग्णांची तपासणी केली, तर ओम गायकवाड यांनी “कंपाउंडर” म्हणून काम पाहिले. या अनोख्या आंदोलनातून त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवले.

यावेळी भुतेकर यांनी आरोग्य केंद्रातील पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरची (RO) तपासणी केली असता, त्यात डोळ्यांना दिसतील इतके किटाणू आढळले. यावरून केंद्र केवळ डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळेच नव्हे, तर मूलभूत सुविधांच्या बाबतीतही पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले. “आरोग्य विभाग जनतेला स्वच्छ पाणी पिण्याचा सल्ला देतो, पण त्यांच्याच केंद्रात असा घाणेरडा पाण्याचा पुरवठा असेल, तर सामान्य माणसाचे आरोग्य कोण सांभाळणार?” असा सवाल भुतेकर यांनी उपस्थित केला.

ही परिस्थिती जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. केंद्रात मंत्री असलेल्या जिल्ह्यात जर प्राथमिक आरोग्य केंद्रांची अशी दयनीय अवस्था असेल, तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

भुतेकर आणि गायकवाड यांनी याप्रकरणी दोषी डॉक्टर आणि आरोग्य केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. “जर येत्या काही दिवसांत यावर ठोस कारवाई झाली नाही, तर आम्ही अधिक तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

या प्रतीकात्मक आंदोलनात ओमराजे गायकवाड, बोर्डे यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या हक्कासाठी युवकांनी पुढाकार घेतला असला, तरी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा मात्र सुस्तावलेली दिसत आहे.

या घटनेने शेळगाव आटोळसह संपूर्ण चिखली तालुक्यातील आरोग्य सेवांच्या दुरवस्थेवर प्रकाश पडला आहे. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!