दोन वर्षांपूर्वी जनतेचा आधार हरपला… गांगलगावचा लोकसेवक ऋषिकेश म्हस्के यांचे द्वितीय पुण्यस्मरण

चिखली (महेश म्हस्के पाटील) बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले, गोरगरिबांचे दुःख आपले मानणारे, शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढणारे ऋषिकेश म्हस्के यांचे आज द्वितीय पुण्यस्मरण आहे. त्यांच्या आठवणींनी आज संपूर्ण गांगलगाव गण भावूक झाला आहे.ऋषिकेश म्हस्के हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गांगलगाव पंचायत समिती गणातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र त्याआधीच त्यांनी कोणत्याही पदावर नसताना समाजासाठी जे कार्य केले, ते आजही अनेकांच्या स्मरणात ताजे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेली आंदोलने, विशेषतः बुलढाणा येथील पाटबंधारे विभागाविरोधातील शेतकरी आंदोलन, हे महाराष्ट्रभर गाजले होते. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यासह विविध शासकीय योजनांचा लाभ गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. कोणत्याही पदावर नसताना परिसरातील अनेक कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारा हा एकमेव चेहरा होता, अशी भावना आजही ग्रामस्थ व्यक्त करतात.गांगलगावसारख्या छोट्याशा गावातून उभा राहून त्यांनी सामाजिक उपक्रम, आंदोलने आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. प्रशासनातील कामचुकार अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी केलेली आंदोलने ही त्यांच्या निर्भीड नेतृत्वाची साक्ष देतात. त्यामुळे अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उघडपणे पाठिंबा दिला होता.पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी काम केले. काही राजकीय अडचणींमुळे त्यांनी पक्ष बदलले असले, तरी जनतेप्रती असलेली निष्ठा कधीही बदलली नाही. कोणत्याही पक्षात असताना, “लोकांना फायदा झाला पाहिजे” हाच त्यांचा एकमेव अजेंडा होता.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पुन्हा सक्रिय होत असताना, गांगलगाव पंचायत समिती गणातून त्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री आ. राजेंद्रजी शिंगणे यांच्याकडे वेळोवेळी केली होती. त्यांच्या जनसंपर्काचा, मित्रपरिवाराचा आणि जनतेच्या प्रेमाचा विचार करून त्यांना संधी द्यावी, अशी भावना सर्वत्र होती.आज त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त गांगलगाव गणातील नागरिक, शेतकरी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांच्या कार्याला उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.लोकसेवेचा दीप विझला असला, तरी त्यांनी पेटवलेली आशेची ज्योत आजही अनेकांच्या मनात तेवत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!