मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील धानोरा शेतशिवाराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या एका शेतातील विहिरीत आज (५ ऑगस्ट) सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे हात-पाय बांधलेले असल्याने हा मृत्यू नैसर्गिक नसून खून केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या शेतमजुरांना विहिरीत हा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा सुरू आहे.
तसेच, फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी बोलावण्यात आले असून ती काही वेळात पोहोचणार असल्याचे समजते. सध्या मृत इसमाची ओळख पटवण्याचे आणि खून नेमका का व कसा झाला याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.