
मेरा बुद्रुक (कैलास आंधळे, बुलडाणा कव्हरेज न्युज): दारूच्या व्यसनात अडकलेली तरुणाई आणि त्यामुळे उध्वस्त होणारी अनेक कुटुंबे यामुळे निर्माण झालेला गंभीर प्रश्न ऐरणीवर येत असताना, देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीतील मेंडगाव गावाने दारूविरोधात एकजुटीने ‘दारूमुक्त गाव’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत गावातील महिलांनी घेतलेली आक्रमक भूमिका विशेष उल्लेखनीय आहे.
लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ही मोहीम राबवली जात असून, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला मंडळांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. गावातील महिलांनी अंढेरा पोलिस ठाण्यात जाऊन ठाणेदार श्री. रुपेश शक्करगे आणि सहायक ठाणेदार श्री. जारवाल यांना निवेदन सादर केले. यावेळी महिलांनी ठामपणे सांगितले की, “पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास आम्ही स्वतः या दारूच्या दुकानांवर मोहीम राबवून ती उद्ध्वस्त करू.”
Guptadhan: गुप्तधनासाठी काळी जादू? रोहडा-गांगलगाव रस्त्यावरील ओसाड गावात संशयास्पद खड्डा…
महिलांच्या या दृढ निश्चयाने आणि गावकऱ्यांच्या एकजुटीने प्रभावित होऊन ठाणेदार श्री. शक्करगे यांनी गावातील अवैध दारू व्यवसायावर पूर्णपणे बंदी (Darubandi) घालण्याचे आश्वासन दिले. या मोहिमेदरम्यान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर गिते यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत शिवानंद काळुसे, गणेश काळुसे, नंदु गिते, समाधान जायभाये, गजानन नागरे, पवन गिते, कुणाल काळुसे, योगेश काळुसे, शंतनु गिते, संजय वाघ, उमेश खाडे, भानदास खाडे, संतोष मुंडे, गणेश मुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे, अनेक पीडित महिला आणि गावातील महिला मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाल्या.
ही दारूविरोधी एकजूट गावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महत्त्वाची ठरेल, अशी आशा या मोहिमेतून व्यक्त होत आहे. मोहिमेचा पुढील टप्पा अधिक प्रभावी करण्यासाठी गावकऱ्यांनी एकदिलाने सहकार्य करावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
1 thought on “Darubandi: मेंडगाव गाव एकवटले: ‘दारूमुक्ती’साठी महिलांचा निर्धार, पोलिसांचा १००% बंदीचा शब्द!”