अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – सिंदखेड राजा तालुक्यातील एका गावात चारित्र्याच्या संशयावरून एका विवाहित महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १२ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास आरोपींपैकी एकाने महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला लोखंडी वस्तूने डोक्यावर मारहाण केली. तर दुसरा आरोपी मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करत मारहाण करत होता. याच वेळी त्याने महिलेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात आरोपी बाळू रवींद्र काकडे आणि सचिन रवींद्र काकडे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११८(१), ११५(२), २९६, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलीस करीत आहेत.













