चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरात नगर परिषदेच्या अखत्यारीत स्वर्गीय दयासागर महाले यांच्या नावाने एक तीन मजली सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. पण या इमारतीच्या बांधकामात काही कॉलम वाकले असल्याने त्यांना आधार देण्यासाठी लोखंडी जॅकेट लावण्यात आले आणि त्यावर काँक्रिटचे आवरण देण्यात आले आहे. हे सगळे पाहता, इमारत मजबूत करण्यासाठी थोडक्यात आणि तात्पुरते उपाय केले जात असल्यासारखे वाटते आहे, ज्यामुळे शहरातील रहिवाशांच्या मनात इमारतीच्या सुरक्षेबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे.
या बांधकामाची गुणवत्ता अतिशय निकृष्ट असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय, भविष्यात या इमारतीत काही दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार धरले जाईल, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, सगळे काम नियमांनुसार आणि योग्य पद्धतीने सुरू आहे, त्यात काही निकृष्ट दर्जाचे नाही. तरीही, या प्रकारामुळे नगर परिषद नागरिकांच्या जीवाशी खेळत तर नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.















