बुलडाणा (ऋषि भोपळे:बुलडाणा कव्हरेज न्युज): भाजपच्या बुलडाणा जिल्हा नेतृत्वात मोठा खांदेपालट करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर आता घाटावरील जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी ही जबाबदारी डॉ. गणेश मांटे यांच्या खांद्यावर होती.
आता त्यांच्याजागी पक्षाने विजयराज शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी दिली आहे.दरम्यान, घाटाखालील जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा एकदा सचिन देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी याआधीही ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.या नव्या नियुक्त्यांमुळे भाजपचे जिल्ह्यातील संघटन अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे नव्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. नव्या नेतृत्वाला पक्षसंघटना बळकट करण्याबरोबरच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे, जनतेशी थेट संवाद साधणे आणि पक्षाची विचारधारा पोहोचवणे अशी अनेक आव्हाने पेलावी लागणार आहेत.या बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना नव्या दिशा मिळण्याची शक्यता आहे. विजयराज शिंदे आणि सचिन देशमुख यांच्याकडे दिलेली जबाबदारी आगामी काळात भाजपसाठी कितपत फलदायी ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.