Bibtya Attack in Buldhana: मंगरूळ नवघरे येथे बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यातील 12 बकऱ्यांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण…

वरखेड (रमेश कणखर, बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखलीतालुक्यातील मंगरूळ नवघरे गावात मंगरूळ-वरखेड रोडलगत असलेल्या शेख अरिफ अमीर हमजा यांच्या बकरीच्या गोठ्यावर जंगली प्राण्याने (Bibtya Attack in Buldhana) रात्रीच्या सुमारास अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गोठ्यातील तब्बल 12 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, शेख अमीर हमजा यांचे कुटुंबीय मोठ्या भावाच्या लग्न समारंभासाठी गावाबाहेर गेले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी गोठ्यावर कोणतीही देखरेख नव्हती. आज सकाळी जेव्हा शेख अमीर हमजा गोठ्यावर पोहोचले, तेव्हा त्यांना सर्व बकऱ्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांनी तात्काळ गावातील पोलिस पाटील, सरपंच व स्थानिक प्रशासनाला माहिती दिली.घटनेची गंभीरता लक्षात घेता गावातील पोलिस पाटील, सरपंच, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर वन विभागाचे वनपाल नेवरे यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले.

या पथकात वनरक्षक जी. एस. उबरहंडे, आर. डी. पैठणे आणि वनमजूर राम भाऊ लोढे यांचा समावेश होता. त्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली.प्राथमिक तपासणीत हल्ला करणारा प्राणी बिबट्या किंवा तडस (बिबट्या सदृष्य प्राणी) असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

तसेच मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि जनावरे ठेवणारे नागरिक प्रचंड घाबरले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सध्या वनविभागाकडून अधिक तपास सुरु असून, बिबट्याचा वावर अटळ असल्यास त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!