भरोसा (अंकुश पाटील : बुलडाणा कव्हरेज न्युज)भरोसा येथील आत्महत्याग्रस्त थुटटे कुटुंबाला माजी आमदार राहुल बोंद्रे आणि माजी सभापती अशोकराव पडघान यांनी सोमवारी रात्री भेट देत आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
या भेटीत माजी सभापती अशोकराव पडघान यांनी स्वतः ११ हजार रुपयांची मदत केली. तसेच माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी चिखली बाजार समितीच्या वतीने २१ हजार रुपये आणि स्वतःकडून ५१ हजार रुपये रोख स्वरूपात मदत केली.
गणेश श्रीराम थुटटे व रंजना गणेश थुटटे हे मेहनती शेतकरी दांपत्य हुमणी अळीच्या प्रचंड हल्ल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान, तसेच बँकांचे कर्ज या ताणामुळे नैराश्यात गेले होते. त्यांच्या नावावर दोन बँकांचे कर्ज होते, जे फेडता न आल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
या दुर्दैवी घटनेनंतर अनेक नेते मंडळींनी भेट दिली, मात्र प्रत्यक्षात आर्थिक मदत फारच कमी झाली होती. त्यामुळे माजी आमदार राहुल बोंद्रे आणि माजी सभापती अशोकराव पडघान यांनी दिलेली मदत समाजासाठी दिलासा देणारी ठरली असून, त्यांच्या या कृतीची गावात सर्वत्र चर्चा होत आहे.