साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): धुऱ्याच्या वादातून थेट जीवघेण्या हल्ल्याची घटना साखरखेर्डा शिवारात घडली. या प्रकरणात दोघा सख्ख्या भावांनी मिळून मधल्या भावाचा “गेम करण्याचा प्रयत्न” केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिनेश लक्ष्मण साखरे (४९, रा. पिंपळगाव सोनारा, ता. सिंदखेड राजा) हे माजी सैनिक आहेत. त्यांची साखरखेर्डा शिवारात गट क्रमांक ७९८ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेताला लाग मोठा भाऊ अरुण लक्ष्मण साखरे व लहाना भाऊ वामन लक्ष्मण साखरे यांची शेती आहे शेतीवरून वाद सुरू असल्याने तिघांचं एकमेकांशी बोलणं बंद आहे. अंदाजे २० दिवसांपूर्वी अरुण साखरे यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरू असताना ट्रॅक्टर चालक मालक विनोद ठोसरे यांच्याकडून दोन भावांच्या मधील धुरा फोडला गेला होता.
याबाबत दिनेश साखरे यांनी ट्रॅक्टर चालकाला फोन करून विचारणा केली असता, “तुम्ही शेतात या, मी तुमचा धुरा व्यवस्थित करून देतो,” असे उत्तर मिळाले.त्यानुसार दिनेश साखरे शेतात गेले. तिथे अरुण साखरे आणि वामन साखरे हे दोघे भाऊ उपस्थित होते. दिनेश यांनी त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. काही वेळाने ट्रॅक्टर चालक विनोद ठोसरे आला आणि दगड लावून फोडलेला धुरा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू लागला.
त्यावेळी अरुण साखरे याने विनोद ठोसरेला म्हटले, “तू दगड लावू नको, इथून निघून जा,” आणि लगेचच “आता याला जिवाने सोडत नाही” असे म्हणत दिनेश यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार वार केला. यामुळे वि साखरे खाली कोसळले. त्याच वेळी वामन साखरे याने लाकडी काठीने पाठीला आणि कमरेला बेदम मारहाण केली.या घटनेवेळी चुलत भाऊ मारुती साखरे यांनी मध्यस्थी करत भांडण थांबवले आणि जखमी दिनेश यांना मोटारसायकलवरून घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर गावातून आणलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आले. सध्या ते आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. आज दिनेश साखरे यांचे पोलिसांनी बयाण नोंदवले असून, पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करत आहेत.