छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावत्र पित्यानेच १९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची आणि या अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून धमकी दिल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
घटना कशी उघडकीस आली?
चिकलठाणा भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची आईने चार वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले. या लग्नापूर्वी तिला दोन मुली होत्या आणि दुसऱ्या पतीपासून एक मुलगी झाली. काही दिवसांपूर्वी रात्री साडेबाराच्या सुमारास तिचा सावत्र वडील तिच्या खोलीत आला. त्याने आईची तब्येत बिघडल्याचे सांगून तिला हॉलमध्ये बोलावले आणि तेथेच तिच्यावर अत्याचार केला.मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करून धमकीअत्याचाराच्या वेळी नराधमाने मोबाईलमध्ये संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले. त्यानंतर कोठेही तक्रार केली तर हा व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी देऊन तो वारंवार तिचा शारीरिक छळ करत राहिला.
आईच्या मदतीने पोलिसांकडे तक्रार
अत्याचाराची मालिका वाढत गेल्यानंतर पीडित तरुणीने ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यानंतर त्यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणाचा तपास चिकलठाणा पोलीस करत असून पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.