अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी मलकापुरात एकाला अटक; २.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी मलकापुरात एकाला अटक; २.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीवर कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. यात एका व्यक्तीला परवान्याशिवाय देशी दारूची वाहतूक करताना पकडण्यात आले असून, त्याच्याकडून सुमारे २ लाख ८८ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १५ जून २०२५ रोजी दाताळा टोलनाक्याजवळ पार पडली.

पोलिस सूत्रांनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घिर्णीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. यावेळी एक टाटा इंडिका व्हिस्टा (क्र. MH-28 V 7976) या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात देशी दारू आढळून आली. या प्रकरणी मोहन नयनसिंग जाधव (वय ३७, रा. घिर्णी, ता. मलकापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात कोकण देशी दारू (संत्रा आणि टॅगो पंच ब्रँड) च्या १८० मिली आणि ९० मिली क्षमतेच्या एकूण १,७१६ बाटल्या आढळल्या. या दारूची अंदाजे किंमत ८८,६२० रुपये आहे. याशिवाय, वाहतुकीसाठी वापरलेली टाटा इंडिका व्हिस्टा गाडी (अंदाजे किंमत २ लाख रुपये) देखील जप्त करण्यात आली आहे. एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २ लाख ८८ हजार ६२० रुपये आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विजय वारुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोहन जाधव याच्याविरुद्ध मलकापूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११९/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा, कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) संजय मातोंडकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, विजय पैठणे, रघुनाथ जाधव, पोलीस नाईक विजय वारुळे, मनोज खरडे, हर्षल जाधव आणि चालक समाधान टेकाळे यांचा समावेश होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!