अंत्री खेडेकर (बुलडाणा कव्हरेज न्युज)— चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील ३५ वर्षीय शेतकरी प्रल्हाद संतोष माळेकर यांनी आर्थिक अडचणींना कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली.
प्रल्हाद माळेकर यांनी राहत्या घरातील अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांनी हा टोकाचा निर्णय नेमका कोणत्या कारणामुळे घेतला याबाबत प्राथमिक चौकशीत समोर आलेली माहिती गंभीर स्वरूपाची आहे.
प्रल्हाद यांच्या नावे १७ गुंठे जमीन होती, मात्र सततच्या नापिकीमुळे त्यातून उत्पन्न होत नव्हते. घरात ८० वर्षीय आजारी आई, तीन लहान मुली, एक मुलगा, पत्नी असा एकूण सात जणांचा मोठा परिवार होता. घरात फक्त दोनच कमावते हात असल्याने खर्चाचा ताण वाढत होता. त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आईची तब्येत आणि वाढती उसनवारी तसेच बँकेचे कर्ज यामुळे प्रल्हाद मानसिक तणावाखाली होते.
कर्जफेड न होणे, सततची आर्थिक कुचंबणा आणि घरातील जबाबदाऱ्या यामुळे प्रल्हाद यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी कुटुंबातील वाढत्या आर्थिक संकटाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.














