खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): संशयाच्या कारणावरून पत्नीची क्रूरपणे हत्या करणाऱ्या पतीला खामगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.बी. जाधव यांनी सश्रम आजीवन कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी अभियोक्ता क्षितिज अनोकार यांनी शासन पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली.
जळगाव जामोद तालुक्यातील कुंवरदेव येथील रुणाबाई दुर्गा पावरा यांचा विवाह जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अंभोडा जिन्सी येथील दुर्गासिंग पावरा याच्याशी झाला होता. मात्र, त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. या भांडणांमुळे रुणाबाई काही काळ माहेरी कुंवरदेव येथे राहायला आल्या होत्या. नंतर दुर्गासिंगही आपल्या मुलांसह कुंवरदेव येथे राहण्यास आला. दोघेही मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. तरीही, संशयाच्या कारणावरून त्यांच्यात सतत वाद निर्माण होत असत.
२३ ऑक्टोबर २०१७ रोजी रुणाबाई आणि दुर्गासिंग चालठाणा शिवारात मजुरीसाठी गेले होते. त्या दिवशी दुर्गासिंगने शेतमालकाकडून २०० रुपये घेतले आणि रुणाबाईला रावेरला जाण्यास सांगितले. मात्र, रस्त्याने जात असताना वनविभागाच्या मेंढामारी बीट परिसरातील एका निर्जन ठिकाणी दुर्गासिंगने रुणाबाईच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आणि तो तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी, २४ ऑक्टोबर २०१७ रोजी, मेंढामारी शिवारात रुणाबाई यांचे प्रेत आढळले. यानंतर रुणाबाई यांचा भाऊ खुमशिंग बारेला याने जळगाव जामोद पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तपास सुरू केला आणि परिस्थितीजन्य पुरावे, अंतिम दृष्टी सिद्धांत आणि रासायनिक विश्लेषणाच्या आधारे दुर्गासिंगला दोषी ठरवले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही, पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दुर्गासिंगला दोषी ठरवून सश्रम आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता क्षितिज अनोकार यांनी प्रभावी युक्तिवाद केल्याने न्यायालयाचा निर्णय शक्य झाला.
2 thoughts on “बायकोच्या डोक्यात दगड टाकून बायकोची हत्या करणाऱ्याला नवऱ्याला आजीवन कारावास…!”