चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान योजनेंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. बल्लाळ देवी संस्थान, अमडापूर तालुका चिखली येथे ही कार्यशाळा पार पडणार आहे.
गळीतधान्य पिकांचे उत्पादन वाढविणे, तेलबिया प्रक्रियेचे आधुनिक तंत्रज्ञान, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग तसेच शासकीय योजना व अनुदान याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.
कार्यशाळेस चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्वेताताई महाले उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संतोष डाबरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यशाळेत डॉ. अमोल झापे (प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा), डॉ. विकास जाधव (प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद), डॉ. संजय उमाळे (वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद) तसेच श्री. प्रशांत सोनुने (जिल्हा संसाधन व्यक्ती, छत्रपती संभाजी नगर) मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेस शेतकरी बंधू, प्रगतिशील शेतकरी, पत्रकार व लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.














