शेगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज) पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीने पैसे परत मागणाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना शेगाव शहरात उघडकीस आली आहे. हॉटेल राजवाडा परिसरात घडलेल्या या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लांजुळ येथील रहिवासी राजू उकर्डा थेरोकार यांनी अकोला येथील दीपक पवार याला दवाखान्याच्या कामासाठी पैसे दिले होते. हे पैसे १५ दिवसांत दुप्पट देण्याच्या आमिष ही आरोपीने दिले होते. त्यामुळे थेरोकार यांनी आरोपीला ८ लाख रुपये दिले होते. मात्र ठरलेली मुदत संपल्यानंतरही आरोपीने पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान,
आरोपी दीपक पवार याने संगनमताने राजू थेरोकार व साक्षीदार अमोल ढोल यांना शेगाव येथील हॉटेल राजवाडा समोर बोलावले. तेथे तोंडाला रुमाल बांधून आलेल्या ५ ते ६ अनोळखी गुंडांसह मुख्य आरोपीने पैसे देत नाही, असे म्हणत शिविगाळ केली. त्यानंतर हातातील लाकडी काठ्यांनी थेरोकार यांच्यावर जीवघेणा हल्ला करत बेदम मारहाण केली. मारहाण थांबवण्यास गेलेल्या अमोल ढोल यांनाही या गुंडांनी मारहाण केली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
नागरिकांनी जखमी अवस्थेतील थेरोकार यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी थेरोकार यांच्या जबाबावरून आरोपी दीपक पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












