देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील सिनगाव जहागिर येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला तिच्या पती व सासऱ्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी लोखंडी रॉड व लाकडी काठीने मारहाण करण्यात आली असून, महिलेच्या स्कुटीची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पूजा आकाश सरोदे (वय २६, रा. सिनगाव जहा, ता. देऊळगाव राजा) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, १८ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादीच्या पतीच्या मोबाईलमध्ये एका अनोळखी महिलेसोबत व्हॉट्सअॅप चॅटिंग आढळून आल्याने पूजाने ही बाब सासरे रावसाहेब हिंमत सरोदे यांना सांगितली.
मात्र समजूत काढण्याऐवजी पती आकाश रावसाहेब सरोदे व सासरे रावसाहेब हिंमत सरोदे यांनी अश्लील शिवीगाळ करत घराजवळील लोखंडी रॉड व लाकडी काठीने फिर्यादीच्या डाव्या पायावर व पोटरीवर मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच सासऱ्यांनी चापटाबुक्क्यांनीही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी आरोपींनी दगडाने स्कुटी फोडून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केल्याचेही सांगण्यात आले आहे. मारहाणीनंतर ‘तुला जिवे मारून टाकू’ अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत आहे.
या घटनेची तक्रार २० जानेवारी रोजी दाखल करण्यात आली असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३२४(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माधव कुटे करीत आहेत.












