“शेतकरी झोपला अन् चोर जागे! मुरादपूरात तुरीची मोठी चोरी…! अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील भुरत्या चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मेहनती शेतकऱ्यांच्या घामावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले आहेत. “पोलिस काय करणार?” अशा थाटात चोरटे बेधडकपणे शेतमाल लंपास करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुरादपूर येथे अशीच धक्कादायक घटना घडली असून, एका तरुण शेतकऱ्याची काढणीस तयार असलेली तूर चोरट्यांनी अक्षरशः साफ केली आहे. योगेश कैलास इंगळे  रा. मुरादपूर, ता. चिखली, जि. बुलढाणा हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुरादपूर शेतशिवारातील गट क्रमांक ७७ मध्ये असलेल्या एक हेक्टर शेतात त्यांनी तुरीचे पीक घेतले होते.

दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता हार्वेस्टरच्या सहाय्याने तुरीची काढणी करून शेतातच १८ कट्टे ठेवण्यात आले होते. तूर वाळवण्यासाठी ती शेतातच ठेवली असता, दुसऱ्या दिवशी १७ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ५ वाजता शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता, तुरीचे कट्टे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे चौकशी करूनही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर १६ जानेवारी दुपारी १२ ते १७ जानेवारी सकाळी ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी अंदाजे १२ क्विंटल वजनाची, सुमारे ६० हजार रुपये किमतीची तूर चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.

या घटनेबाबत योगेश इंगळे यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांनी रात्री शेताची राखण कशी करायची, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!