देऊळगाव घुबे येथे उद्या जल्लोषात ‘आदर्श जीवन पुरस्कार’ वितरण; जानकीदेवी विद्यालयाचा मैदानावर…
देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज):भारत शिक्षण प्रसारक मंडळ, देऊळगाव घुबे ही संस्था जिल्ह्यातील शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ओळखली जाते. संस्थेच्या वतीने दरवर्षी समाजासाठी विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘आदर्श जीवन पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते.
सन २०२५-२६ या वर्षासाठी संस्थेने विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड जाहीर केली आहे. त्यामध्ये डॉ. अभिजित नारायणराव पडधान पाटील (मेरेकर), व्यवस्थापकीय संचालक पद्मश्री विखे पाटील प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांना आरोग्य सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल, मालतीताई संदीप शेळके (राजर्षी शाहू परिवार) यांना सहकार क्षेत्रात, बळीराम तोताराम मिसाळ (मुंबई) यांना उद्योजक क्षेत्रात, तर रविंद्र सूर्यभान साळवे (साळये, चिखली) यांना साहित्य क्षेत्रात आणि समाधान माधवराव गाडेकर (चिखली) यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श जीवन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा शेनफडराव धुबे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, मान्यवरांच्या शुभहस्ते व विशेष उपस्थितीत पार पडणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.
हा गौरव सोहळा रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, जानकीदेवी विद्यालयाच्या प्रांगणातील नवनिर्मित प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तसेच पुरस्कार वितरणानंतर रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्यास नागरिकांनी, पालकवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारत शिक्षण प्रसारक मंडळ, जानकीदेवी परिवार व रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे













