डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):बालवयातच विद्यार्थ्यांवर सुसंस्कार रुजवून आदर्श समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करीत असतात. समाजात शिक्षकांना विशेष मान-सन्मान आहे. मात्र शिक्षण विभागाच्या एका आदेशामुळे शिक्षकांची प्रतिमा डागाळली जात असल्याची चर्चा मेहकर येथे सुरू आहे.
सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कुत्र्यांमुळे त्रास होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याची दखल घेत न्यायालयाने कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार शासनाने नगरपालिका व महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
या आदेशांच्या अंमलबजावणीत मेहकर नगरपालिका आरोग्य विभागाने मुख्याध्यापकांना पत्र देऊन शाळा परिसरातील कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी एका शिक्षकाची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यास सांगितले. त्यानुसार मेहकर शहरातील ११ नगरपालिका शाळांमध्ये प्रत्येकी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये शाळा परिसरात भटक्या अथवा पाळीव कुत्र्यांचा प्रवेश रोखणे, कुत्र्यांनी शाळेत आश्रय घेतल्यास नगरपालिकेला कळवणे, शाळेची भिंत तुटलेली असल्यास दुरुस्तीची सूचना देणे, गेट नसल्यास गेट बसवून घेणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
मात्र या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचे नावे शाळेच्या दर्शनी भागावर फलकाद्वारे लावण्यात आल्याने व काही ठिकाणी भिंतीवर रंगविण्यात आल्याने शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. “कुत्रे हाकलण्याचे काम शिक्षकांकडे देणे आणि त्यासाठी नाव फलकावर झळकावणे योग्य आहे का?” असा सवाल शिक्षक व पालकवर्गातून उपस्थित होत आहे.
या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता पसरली असून प्रशासनाने या विषयावर संवेदनशीलतेने विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.















