चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुका क्रीडा संकुल (मैदान) नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक महिन्यापासून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरावासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर १५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत चिखलीचे तहसीलदार विजय सवडे यांनी तालुका क्रीडा संकुल मैदान खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
३० डिसेंबर रोजी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार विजय सवडे यांना निवेदन दिले होते. २० जानेवारी २०२६ पासून पोलीस भरतीच्या शारीरिक चाचण्या सुरू होणार असल्याने तातडीने मैदान खुले करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी या निवेदनात केली होती. नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटूनही मैदान बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले होते.
या निवेदनाच्या वेळी दत्तात्रय खेडेकर (डिके पाटील), राष्ट्रवादी काँग्रेसचे शंतनूभाऊ बोन्द्रे यांच्यासह पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी गणेश लोखंडे, गणेश खेडेकर, अमोल हाडे, अमोल सदार, मंगेश सोळंकी, अमोल आंभोरे यांच्यासह शंभर ते दीडशेच्या आसपास विद्यार्थी उपस्थित होते.
यापूर्वी निवडणूक काळात क्रीडा संकुल बंद असल्याबाबत विद्यार्थ्यांनी नगरपालिका सीईओ व तहसीलदार यांची भेट घेतली होती. त्यावेळी तहसीलदार सवडे यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीची दखल घेऊन मैदान लवकरच खुले करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत तहसीलदारांनी तात्काळ मैदान खुले करून दिले.
या निर्णयासाठी तहसीलदार विजय सवडे, चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले, शंतनूभाऊ बोन्द्रे, शिवराज दादा पाटील, कपिल पाटील खेडेकर यांच्या सहकार्याबद्दल पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने दत्तात्रय खेडेकर (डिके पाटील) यांनी आभार व्यक्त केले आहेत.













